अमरावती जिल्ह्याला बुधवारी रात्री दहा वाजता भूकंपाचे धक्के बसले आहे. भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असून यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित किंवा वित्त हानी झाली नाहीय.
मेळघाटातल्या धारणी तालुक्यात सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू गावांच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्हा प्रशासनाकडून धारणी तहसीलदारांना भूकंपाची माहिती देण्यात आलीय. भूकंपामुळे काही मोठं नुकसान झालंय का याची माहिती घेण्यासाठी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भूकंपाचे धक्के जाणवलेल्या गावात संपर्क साधला असता सौम्य धक्के जाणवल्याचं सांगण्यात आलं.
भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असली तरी गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवाझिरी गावात शंभर एक घरं असून गावकऱ्यांमध्ये घबराट पसरलीय. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमरावतीला भूकंपाचा धक्का बसला होता. तेव्हा चिखलदरा तालुक्यातल्या अमझरी-टेटू गावात भूकंपाचं केंद्र होतं. गेल्या ९ महिन्यात दुसऱ्यांदा मेळघाट भूकंपाच्या धक्क्यानं हादरलंय.
Discussion about this post