अमळनेर । घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकापाठोपाठ तीन घरांना भीषण आग लागली. ही घटना अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे घडली. या आगीत दोन घर जळून खाक झाली असून एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या दुर्घटनेत घरातील सामान व घरातील रोकड जळाल्याने सुमारे ७ लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील करणखेडा गावात राहणाऱ्या बापुराव राजधर धनगर वय ६६ हे आपल्या पत्नी रत्नाबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवारी १० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास रत्नाबाई यांनी चहा ठेवण्यासाठी गॅस सुरू केला असता अचानक गॅसने भडका घेतला. यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने बाजूची तीन घरे असे एकुण ३ घरांना आग लागली. या आगीत बापूराव राजधर धनगर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ४ लाखांची रोकड व संसारोपयोगी वस्तून जळाली, शेजारी राहणारे आसाराम राजधन धनगर यांच्या घरात कपाशीचे ठेवलेले ३ लाखांची रोकड व संसारोपयोगी वस्तून जळाली, गोपाल आत्माराम गुरव यांच्या दुकानातील रेशनचे धान्य व दप्तर जळून खाक झाल तर सरला गोरख पवार या महिलेच्या घरातील संसारोपयोगी वस्तू आणि महत्वाची कागदपत्रे जळाली आहे. असे एकुण ७ लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
आग लागल्याने गावातील ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवण्यासाठी अमळनेर नगरपालिकेशी संपर्क साधला. नगरपालिकेचे मुख्याध्याकारी तुषार नेरकर यांनी तात्काळ अग्निशमक दलाला सूचना देत अग्निशमन विभागाचे दिनेश बिऱ्हाडे, वाहन चालक फारुख शेख, फायरमन मच्छिन्द्र चौधरी, वासिम पठाण यांनी बंब घेवून घटनस्थळी दाखल होवून शर्तीचे प्रयत्न करून ही आग विझविण्यात आली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. याप्रकरणी बापूराव धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून सायंकाळी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.