जळगाव : अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या घटस्फोटीत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला असून त्यानंतर ती गर्भवती झाली, परंतु संशयित आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपशील असा आहे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात 28 वर्षीय विवाहिता कुटुंबासह राहत आहे.तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. सन 2021 मध्ये तिची ओळख एकनाथ छबीलाल पाटील (रा. सोनवद, ता. धरणगाव) याच्याशी झाली. ओळखीनंतर त्यांचे नाते प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. आरोपी एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मुलीला संभाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलेने पतीशी घटस्फोट घेतला आणि एकनाथसोबत पुणे येथे पाच महिने पती-पत्नीसारखे नांदू लागली.
या काळात संशयित आरोपीने विवाहितेवर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली. परंतु, नंतर एकनाथने विवाह करण्यास नकार दिला आणि मुलगी संभाळण्याची जबाबदारीही स्वीकारली नाही. महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने मंगळवार (दि.11) रोजी रात्री 1 वाजता मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी एकनाथ छबीलाल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी डीवायएसपी आण्णासाहेब घोलप हे करत आहेत.















Discussion about this post