मुंबई । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील गाडीला मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील मुक्तेश्वर रोड परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेली इनोव्हा गाडी सहभागी होती.
ही घटना सोमवारी (19 जानेवारी) रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हे विमानतळावरून जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी जात असताना, त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या इनोव्हा गाडीला एका बेदरकारपणे चालवलेल्या मर्सिडीज कारने जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की इनोव्हा गाडी थेट दोन चाकांवर उभी राहिली, तर या अपघातात एक रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सुरक्षित असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मर्सिडीज चालकाच्या बेदरकार वाहनचालना बाबतही चौकशी केली जात आहे.















Discussion about this post