मुंबई: बंडखोरीनंतर अजित पवार यांनी आज बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) बैठकीला पक्षाच्या ५३ पैकी ३५ आमदारांनी हजेरी लावली. यावेळी संबोधित करताना अजित पवार यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी आजच्या भाषणातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पोलखोल केली. तसेच शरद पवार यांच्या राजकारणातील धरसोडवृत्तीवरही भाष्य केलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे माझं आजही दैवत आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त आमदार असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची संधी गमावली होती. भारतीय जनता पक्षातील नेते वयाच्या ७५ व्या वर्षी निवृत्त होतात, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांचे काका ८३ वर्षीय शरद पवार यांची खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे 2014 मध्ये भाजपची सत्ता आली, असे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्या काही लोककल्याणाच्या योजना राबवण्यासाठी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे आहे.
त्याचवेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाराष्ट्रात एमव्हीए सरकार पडणार असताना राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवार यांना भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती. वांद्रे उपनगरात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांपैकी 5 नेतेही सहभागी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत काळसे म्हणाले की, अजित पवार यांना अपात्रता टाळण्यासाठी किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
Discussion about this post