मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणतीही फूट पडली नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत…” असे मोठे विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. बारामती येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, सुप्रिया सुळेनंतर शरद पवार यांनीही पक्षात फूट नसल्याचे विधान केल्याने राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सुप्रिया सुळेंनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार आमचेच नेते असल्याचे विधान केले आहे. “पक्षातून एक मोठा गट वेगळा झाला तर पक्षात फूट होते. तशी स्थिती इकडे नाही, काही लोकांनी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे.. असे शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच त्यांनी तो निर्णय घेतला म्हणून लगेच फुट म्हणायचे काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे. असेही ते यावेळी म्हणाले. सुप्रिया सुळेंनंतर शरद पवार यांनीही अजित पवार आमचेच नेते असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांचीही बीडमध्ये सभा होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी “लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे यामध्ये कोणीही चिंता करण्याची गरज नाही, कोणीही जाहीर सभा घेऊ शकतो. मात्र जनतेला नक्की काय सत्य आहे ते माहिती आहे…” असा टोलाही लगावला.