दिल्ली । अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यांचा अपघात होता की घातपात होता? हा प्रश्न सातत्याने विविध तांत्रिक त्रुटींच्या आधारे विचारला जात आहे. त्यातच, अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दरम्यान रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, संबंधित VSR कंपनीच्या मागे “मोठे लोक” आहेत आणि कंपनीला राजकीय संरक्षण दिले जात आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत राहुल गांधी यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडेही त्यांनी हस्तक्षेपाची मागणी केली.
“सीसीटीव्ही फुटेज मागितले तरी दिले जात नाही. माहिती मागितल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. या ट्रोलिंगच्या मागे नेमके कोण आहे?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. अनेक मोठे अधिकारी VSR कंपनीला मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अपघाताच्या कारणांबाबत अधिकृत चौकशी अहवालाची प्रतीक्षा असताना आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण अधिकच गाजत आहे. या घटनेमुळे राज्य आणि केंद्रातील राजकारण पुन्हा तापले असून, निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.















Discussion about this post