नंदुरबार : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अजूनही मित्र पक्षात जागावाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसापूर्वी महायुतीमधील भाजपने पहिली यादी जाहीर केली. तर लवकरच अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी काही पक्षांकडून नाव जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहे. यातच नंदुरबारचे भाजपचे नेते भरत गावित यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर पक्षाने गावित याना एबी फॉर्म देऊन विधानसभा निवडणुकीची संधी देखील दिली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याने कार्यकर्त्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी भाजपला रामराम ठोकत नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला. यानंतर अजित पवार यांनी गावित यांना लागलीच विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. मात्र भरत गावित यांच्या पक्ष प्रवेशानंतर जिल्ह्यात नाराजीनाट्य सुरु झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उमटत आहे.
गावित यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांकडून पक्षाचा राजीनामा देण्यात आला आहे. यामध्ये अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने भरत गावित यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच याचा परिणाम विधानसभेत निवडणुकीवर होणार का? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.















Discussion about this post