भोपाळ: गुजरात पाठोपाठ काँग्रेसला मध्य प्रदेशात जोरदार धक्का बसला आहे. इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सुरतमध्येही पक्षाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. आता इंदूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक रिंगणात नाही.
अक्षय बम उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत भाजप आमदार रमेश मेंडोलाही होते. भाजपने इंदूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे उमेदवार अक्षय बम यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की इंदूरमधील काँग्रेस लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांचे पीएम मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये स्वागत आहे.
मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून अक्षय कांती बम यांनी २४ एप्रिलला अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी स्वत:कडे ५७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. आपल्याकडे कोणतीही कार नसल्याचं त्यांनी अर्जात म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या घड्याळ्याची किंमत १४ लाख रुपये इतकी आहे.















Discussion about this post