जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत तत्वत: प्रशासकीय मान्यता देवून त्यासाठी २५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भात दि. १४ ऑक्टोबर रोजी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
माहिती आणि संवाद तंत्रज्ञानामुळे प्रसार माध्यमांच्या क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. कार्पोरेट आणि विपणन उद्योगाचा विस्तारही तितक्याच वेगाने होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रशिक्षित आणि सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात सक्षम आणि प्रभावी विद्यार्थी घडविण्याकरीता विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांनी विद्यापीठात “स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम” उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
दि. १४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हे सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये “स्व. बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम” भवनाच्या बांधकामासाठी ८ कोटी, वसतिगृहाच्या बांधकामासाठी ७ कोटी, दृकश्राव्य केंद्र उपकरणे खरेदीसाठी ५ कोटी आणि या केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी तसेच आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी ५ कोटी अशा एकूण २५ कोटींच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.सुधीर भटकर यांनी शासनाचे तसेच उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळ आदींचे आभार मानले आहेत.
शासन निर्णय वाचण्यासाठी : इथे क्लीक करा















Discussion about this post