मुंबई । छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुषार घाडीगावकर असं आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचे नाव असून राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आहे या घटनेने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या नवीन माहितीनुसार, तुषार घाडीगावकरकडे कामाची कमतरता नव्हती. तो सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत काम करत होता आणि त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण व्यावसायिक नसून कौटुंबिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुषार घाडीगावकर यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप येथे गेले. त्यानी रुपारेल महाविद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. दर्जेदार अभिनयामुळे तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. काही वर्षांपूर्वी तो भांडूप सोडून पश्चिम उपनगरातील राम मंदिर येथे भाड्याच्या घरात पत्नीसोबत राहत होता. त्यांचे आई-वडील भांडूपमध्येच राहतात.
शुक्रवारी पत्नी नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर तुषार घरी होता अशी माहिती आहे, त्याने मद्यप्राशन केल्याची माहिती देखील समोर येत आहे. दुपारच्या सुमारास त्याने पंख्याला लटकून गळफास घेतल्याचा अंदाज आहे. सायंकाळी पत्नी घरी परतल्यावर तुषारचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तुषार घाडीगावकर याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तुषार घाडीगावकरने छोट्या पडद्यावरील ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. तसेच ‘भाऊबळी’, ‘उनाड’ आणि ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. त्याने नाटकापासून अभिनयाला सुरुवात केली होती. ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही त्याने काम केले आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतही तो झळकला.
Discussion about this post