नंदुरबार : राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालले याच दरम्यान नंदुरबारमध्ये काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली. क्लासवरून सायकलने घरी जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थीनीला डंपरने जोरदार धडक दिली. यात गंभीर अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.सदर घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डिंपल सोनार असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. ती नेहा पार्क परिसरात राहत होती. नेहमीप्रमाणे ती क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. डिंपल साई कोचिंग क्लासेसमध्ये अभ्यासासाठी गेली होती. क्लासवरून ती सायकलीने घरी परतत असताना धुळे चौफुली येथे डंपरने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती सायकलीसह खाली कोसळली होती.
गाडीने तिला फहरफटत नेले यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. गंभीरित्या जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.भरधाव वेगात ट्रक चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यात सध्या १० वीच्या परीक्षा सुरू आहेत. दहावी म्हणजे आपल्या आयुष्याला नवी कलाटणी देणारं वर्ष असतं. दहावीत चांगेल गुण मिळवून काहीतरी मोठं करण्याचं डिंपलचं स्वप्न होतं. मात्र आता हे स्वप्न स्वप्नचं राहिलं आहे.















Discussion about this post