जळगाव । शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव डंपरने स्कूटीला धडक दिली. यात चार वर्षीय शाळकरी चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, योगेश नेमाडे हे आपल्या पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा आणि मुलासह माऊली नगरात वास्तव्याला असून त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा ही जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत आहे.
नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटी (एमएच १२ ईडब्ल्यू ८८२९) घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ६७६९) ने जोरदार धडक दिली.
या धडकेत चिमुकली प्रेरणा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता.
एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post