मुक्ताईनगर । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच लक्झरी बस व टँकरमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर सात ते आठ जण जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अकोटवरून इंदोरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या केमिकल टँकरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात टँकरमधील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, सुदैवाने ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघातामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीस उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.















Discussion about this post