मुंबई । राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. त्यानुसार अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
कृषिमंत्रिपद गेल्यानंतर बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांसाठी अंतिम असतो. मी नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती केली होती की मला खातं बदलून द्या. माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आहे.
मी या निर्णयावर खूश आहे. कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फायदा होईल यासाठी काम केलं. सरकारला सूचवलेल्या अनेक योजना राबवल्या गेल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी मागील वर्षभर केला. हे सर्व काम करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मदत झाली, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.