यावल । तरुणांमध्ये आत्महत्या सारखे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. देवेंद्र प्रभाकर जंजाळे (वय ३७) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव नावरे रस्त्यावरील रहिवासी देवेंद्र प्रभाकर जंजाळे (वय ३७) या तरुणाने त्याच्या घरामागील मयत धोंडू साळी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दहिगाव शिवारात २४ फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
याबाबतची माहिती मयताचा लहान भाऊ भूपेंद्र जंजाळे यांनी यावल पोलिसात दिली यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी मयत देवेंद्र जंजाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, सदर मयत तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार व सहकारी करीत आहे. तरूणाने केलेल्या आत्महत्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post