जळगाव । जळगाव तालुक्यातील दापोरा येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. ज्ञानेश्वर त्र्यंबक वाणी (वय ३५, रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दापोरा येथे ज्ञानेश्वर वाणी हे आई-वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत असून ते शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शुक्रवारी १५ मार्च रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळल्यामुळे दापोरा ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर पुलावर खंबा क्रमांक ४०७च्या १ ते ३ दरम्यान ज्ञानेश्वर वाणी यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
आजूबाजूच्या ग्रामस्थांना घटना समजली तेव्हा त्यांनी दापोरा गावचे पोलीस पाटील जितेश गवांदे यांना माहिती दिली. पोलीस पाटील गवांदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला खबर देऊन सदर मृतदेह हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.
ज्ञानेश्वर वाणी यांना मयत घोषित करताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post