जळगाव l कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यासाठी जपान, चीन, इटली, अमेरिका तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये खऱ्या अर्थाने विविधतेचे दर्शन घडले.
शनिवार दि. २५ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रशाळांमधील माजी विद्यार्थ्यांचा दिवसभराचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी ७०० माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये जपान, चीन, इटली, अमेरिका तसेच जम्मू, हैद्राबाद आणि महाराष्ट्रातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिनेट सभागृहात सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन झाले. कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारत सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे उपसंचालक सत्यविनायक मुळे हे प्रमुख पाहुणे तर अंकलेश्वरच्या झेंटीव्हा प्रा.लि.च्या जागतिक नियामक प्रकरण तज्ज्ञ डॉ.भारती पाटील या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती होती. सत्यविनायक मुळे यांनी आम्हा विद्यार्थ्यांना आकाशात विहार करण्यासाठी आमच्या पंखात विद्यापीठाने बळ भरले. त्याकाळी कमी सुविधा असतांनाही उत्तम प्रकारचे शिक्षण दिले. विद्यापीठ गीतातील शील, एकता आणि चारित्र्य या भावना विद्यार्थ्यांच्या मनात इथल्या शिक्षकांनी कोरल्या त्यामुळे आम्ही घडलो असे मत व्यक्त केले. डॉ. भारती पाटील म्हणाल्या की, पहिले कुलगुरू डॉ. ठाकरे यांनी विद्यापीठाची पायाभरणी करून खऱ्या अर्थान अंतरी ज्ञान ज्योत पेटवली उत्तम शिक्षक, टीम वर्क, आणि गुणवत्ता या विद्यापीठात अनुभवता आल्या. अलिकडे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी पडत असल्याचे दिसते असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी समन्वयक प्रा. किर्ती कमळजा यांनी प्रास्ताविक करतांना आयोजनामागची भूमिका सांगितली. प्रा. पवित्रा पाटील यांनी यावेळी मतदार जागृती शपथ दिली. काही निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. अभय पिंपरकर, ऋचा नेवे, संजय पवार, सुजाता सैंदाणे, ललित चौधरी, डॉ. अनिल झोपे , डॉ. उपेंद्र धगधगे, अजय खैरनार, नितीन पाटील, डॉ. रोहित मेश्राम, भाग्यश्री म्हात्रे यांचा समावेश होता.
काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या प्रशाळांमध्ये सद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शवली. राजेश चौधरी, ॲड. सलीम खान, श्रीकृष्ण यादव, डॉ. स्वाती तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. राजेश जवळेकर यांनी इन्क्युबेशन सेंटर विषयी माहिती दिली. प्रा. भूषण चौधरी यांनी माजी विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी काय करता येईल या विषयी आवाहन केले. प्रा. विना महाजन व डॉ. विजय घोरपडे सूत्रसंचलन केले. डॉ. विशाल पराते यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर सर्व माजी विद्यार्थी आपआपल्या शैक्षणिक विभागांमध्ये गेले व सद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
Discussion about this post