जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने मोळी खळबळ उडाली आहे.कार्तिक शशिकांत बडगुजर (वय २ वर्ष) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.
पिंप्री येथे शशिकांत बाबूलाल बडगुजर हे वास्तव्यास आहेत. पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा कार्तिक बडगुजर बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला.
हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी त्याला उचलले. परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्यामुळे भांबवलेल्या आजोबा तसेच कुटुंबियांनी लागलीच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासले असता, कार्तिक याची प्राणज्योत मालवल्याचे समोर आले. हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
Discussion about this post