नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच आज जम्मू-कश्मीरमध्ये भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला. वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस दरीत कोसळली. त्यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
राजौरी आणि पुँछ जिह्याच्या तुलने रियासी जिह्यात मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी कारवाया होताना दिसत नाहीत. मात्र, आज मोदींचा शपथविधी सुरु असतानाच रियासी जिह्यातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही -अमित शाह
भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे अत्यंत दुःख झाले. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना हिंदुस्थानातील कायदाच कठोरातील कठोर शिक्षा करेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्थानिक प्रशासन घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच इश्वरचरणी प्रार्थना असेही त्यांनी म्हटले आहे.















Discussion about this post