छत्रपती संभाजीनगर । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून अशातच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
नितीन वाघ असं अत्याचार करणाऱ्या (Crime News) आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन आणि पीडित मुलीची १५ दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिला उस्मानपुऱ्यातील येथील एका कॅफेवर भेटण्यासाठी बोलावले.
पीडिता कॅफेवर गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटोही काढले. याच फोटोंच्या आधारे आरोपीने पीडितेला धमकावत सातारा परिसरातील एका हॉटेलात बोलावून घेतलं. तिथे आरोपी नितीन याने पीडितेवर दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेल्या प्रकार आईला सांगितला. आईने तिला धीर देत रविवारी (३१ डिसेंबर) सातारा पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी नितीन वाघ याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सोमवारी नितीनला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे परिसर संतापाची लाट उसळली आहे.















Discussion about this post