मुंबई । मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या यांच्या घरातून मोलकरणीने रोकडसह लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. पुष्कर श्रोत्रीनं या प्रकरणी पती-पत्नीविरोधात विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विलेपार्ले पूर्व येथे राहणारा मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीकडे घरातील कामासाठी आणि त्याच्या वडिलांचा सांभाळ करण्यासाठी तीन मोलकरणी काम करत होत्या. त्यापैकी एक उषा गांगुर्डे (41) नावाच्या महिलेनं सुमारे 5 ते 6 महिने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत काम केलं आहे. तिने श्रोत्रीच्या घरातून 10.27 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1.20 रुपये रोख चोरले आहेत.
22 ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला उषा गांगुर्डे हिच्यावर संशय आला. त्यावेळी श्रोत्री कुटुंबानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. पोलीस तपासादरम्यान तिनं पैसे चोरल्याचे कबुल करून पती भानुदास गांगुर्डे यांच्याकडे दिले. तिच्या पतीनंही चोरीचे पैसे मिळाल्याची कबुली दिली. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी 26 ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डे आणि त्यांच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 381, 406 आणि 420 अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.