अकोला | दिल्लीतील २६ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमधून समोर आलीय. शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. सोबत राहणाऱ्या मित्रानेच तिचा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांना आहे. कुणाल उर्फ़ सनी महादेव शृंगारे असं तिच्या सोबत राहणाऱ्या मित्राचं नाव आहे. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. कुणालनं काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. कुणाल पाच ते सहा महिन्यांपूर्वी वैशाली वाईन बारमध्ये वेटरचं काम करत होता. त्यानंतर दोघेही प्रतिक नगरमध्ये खोली घेवून राहत होते. कुणालला दारू पिण्याचं व्यसन होतं.
मात्र, काल २३ जुलै रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला. दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट होती. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून कुणाल फरार आहे, अशी माहिती मूर्तिजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली.
आज सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला. लागलीच त्यांनी या संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्यास्थित पंचनामा करून मृतदेह वैद्यकिय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कुणालच्या शोधार्थ पोलिसांच्या स्थानिक शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांचे विविध पथक रवाना करण्यात आलेत. लवकरच मारेकऱ्याला गजाआड करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे.















Discussion about this post