जळगाव । शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी होत नसून अशातच जळगावमधील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शनिवार सकाळी मेहरूण जवळील वनीकरण विभागात उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरूण परिसरातील एकनाथ नगरात ठाकूर हरि राठोड (वय-४५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी २० ऑक्टोबर रेाजी रात्री त्यांनी कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर गुरांच्या गोठ्याजवळ ते झोपले होते. गुरांना चारा आणायचा असल्याने त्यासाठी ते वनीकरण विभागाकडे गेले. त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या परिसरात काही गुराखी गेले असता त्यांना ठाकूर हरी राठोड यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्याविषयी त्यांनी इतरांना माहिती दिली. काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना या विषयी कळविले. त्या वेळी पोलिस नाईक मुदस्सर काझी हे घटनास्थळी पोहचले व नागरिकांच्या मदतीने राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिवदास नाईक, फिरोज तडवी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी कमलाबाई, तीन मुले, एक सून असा परिवार आहे.
Discussion about this post