चोपडा । पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टरने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मयत डॉक्टरांची कार पुलावर आढळून आली. दरम्यान त्यांच्या कारमध्ये एक कागद लिहिलेला आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही .आर .पाटील ओळखले जातात.त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती, तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते. पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.
दरम्यान, त्यांनी चोपडा तालुक्यातील निमगव्हाणजवळ असणाऱ्या तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आपली चारचाकी गाडी पुलावर लावून त्यांनी पुलावरून थेट नदीत उडी घेतली. यामुळे पाळधी गावासह धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली. मंगळवारी अमळनेर तालुक्यात त्यांचा मृतदेह वाहून आला. काही भिल समाजाच्या तरुणांना तो दिसून आला. घटनेची माहिती कळताच अमळनेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राकेश, सून, नातवंडे असा परिवार आहे. पाळधी येथील मेन रोडवर कस्तुरबा नावाचे हॉस्पिटल आहे. दरम्यान त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे समता परिषदेचे भूषण महाजन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
Discussion about this post