जळगाव । जळगाव जिल्ह्यात पोलील दलात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खातं उघडून त्यावरुन इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर इतरांकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, “कुठलीही शहानिशा केल्याशिवाय माझ्या नावाने उघडलेल्या फेसबुकच्या खात्यावरुन पैशांची मागणी करणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नये”, असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केलं आहे.
२८ मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. तसेच त्याद्वारे पैशांची मागणी करत आहे. बुधवारी हा प्रकार समोर आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रकाराची माहिती घेतली. यात खरोखर कुणीतरी बनावट नावाने खाते उघडून पैशांची मागणी करत असल्याचे समोर आलं.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (वय ३६, रा. नवीन पोलीस कॉलनी) यांनी चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करत आहेत.
Discussion about this post