धुळे : महावितरणकडून अवाजवी बिलाची आकारणी केली जात असल्याची ओरड नेहमीच होत असून अशातच धुळ्यामधील शिरपूर तालुक्यातील लौकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात झोपडीत राहणाऱ्या वृद्धेला तब्बल ८३ हजारांचे बिल विभागाने पाठविले आहे. यावरून महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
इंदूबाई हिरालाल भील असे या महिलेचे नाव असून हि वृद्धा आपला मुलगा, सून आणि नातवंडांसह लौकी येथील एका झोपडीत राहतात. मोलमजुरी करून ते पोट भरतात. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात वीज जोडणी झाली होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना सरासरीपेक्षा हजारो पट अधिक म्हणजेच ८० हजारांहून जास्त विज बिल येत आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
दरम्यान इंदूबाई यांच्या मुलाने वारंवार महावितरण कार्यालयात तक्रारी केली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वृद्ध महिलेवर अन्याय झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून घरात केवळ एक लाईट आणि फॅन असूनही एवढे बिल येणे हे अजबच आहे. योग्य चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे; अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. यावरून महावितरणच्या भोंगळ कारभाराची पोलखोल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
दरम्यान, वीज ग्राहकांच्या घरोघरी जाऊन नवीन वीज मीटर बसविण्यात येत आहेत. याबाबत परवानगी नसताना वीज मीटर बदल्यानंतर ग्राहकांकडून ओरड सुरु आहे. तर ज्यांचे मीटर बदलण्यात आले आहेत. त्यांच्या वीज बिलात दुप्पटीने वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. इतकेच नाही तर विजेचा अधिक वापर नसताना देखील सरासरी बिलाची आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे
Discussion about this post