चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत रनिंगसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना गणेशपूर शिवारातील पाटणा रस्त्यावर घडली.
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील रिंकेश गणेश मोरे (वय १३) याचा घटनेत मृत्यू झाला आहे. रिंकेश हा तीन मित्रांसोबत पाटणा रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास रनिंग करण्यासाठी गेला होता. सर्वांच्या पुढे धावत असलेल्या रिंकेशला काही अंतरावर बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच रिंकेशने मागे धावत येणाऱ्या मित्रांना आवाज देऊन तो स्वतः जवळच्या एका झाडावर चढला. त्याच्या मागून धावणाऱ्या मित्रांनी हे पाहताच, तिघे मागच्या मागे गावाकडे पळाले. गावात येताच त्यांनी सदर घटनेची माहिती दिली.
यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. गावापासून एक किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी रिंकेश झाडावर चढला होता, त्या ठिकाणी रिंकेश आढळून आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता एका ठिकाणी रक्त पडलेले दिसून आहे. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता रिंकेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेजवळ दातांचे निशाण होते, तर त्याचा मागचा भाग खाल्लेला आढळून आला. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळताच त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावण्यात येत असल्याचे पोलिस पाटलांनी सांगितले.
Discussion about this post