जळगाव | जळगावचा सुपुत्र डॉ. सौरभ तळेले याची जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलॅन्ड येथील टयू डेल्फट् विद्यापीठ, डेल्फट् येथील बायोनॅनो विज्ञान विभागात शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उपकुलसचिव विकास तळेले आणि जळगाव पोस्टातील सेवानिवृत्त सहायक सुप्रिया तळेले यांचे सुपुत्र असलेल्या डॉ. सौरभ तळेले याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रूस्तुमजी हायस्कूलमध्ये झाले व अकरावी व बारावीचे शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयात केल्यानंतर भारत सरकारच्या इन्स्पायर फेलोशिपसाठी तो पात्र ठरला आणि पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) एमएस पूर्ण केले. त्यानंतर दक्षिण कोरीया येथील यलसन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नालॉजी व इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक सायन्सव्दारे सौरभला मानाची फेलोशिप संशोधनासाठी प्रदान करण्यात आली.
त्याने बायोमेडिकल इन्स्ट्रयूमेंटेशन या विषयात पीएच.डी प्राप्त केली. या विषयातील त्याचे सखोल ज्ञान पाहून नेदरलॅन्ड येथील टयू डेल्फट् विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठात शास्त्रज्ञपदी निवड केली. तो या विद्यापीठात नुकताच शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाला आहे. याच विद्यापीठात तो अनकव्हर बायोफिजिकल मॅकॅनिझम असोसिएटेड वूईथ युकॅरॉयोटिक डीएनए रिप्लीकेशन या विषयावर देखील संशोधन करीत आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेदरलॅन्ड येथील विद्यापीठात सौरभ तळेले रूजू झाल्यामूळे खान्देशाच्या बहूमानात मानाचा तुरा खोवला गेला आहे.