धरणगाव : जळगाव जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच कापूस व्यापाऱ्याची कार अडवून तीन चोरट्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम लुटून नेल्याची खळबळजनक घटना धरणगावनजीक मुसळी फाट्याजवळ शनिवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास हा थरार घडला.
भोद खुर्द शिवारात दुर्गेश इम्पेक्स जिनिंग अनिल अग्रवाल व दुर्गेश अग्रवाल यांच्या मालकीची आहे. लेखापाल योगीराज शिवराज पाटील, चालक उमेश मगन ठाकरे व कामगार दीपक ज्ञानेश्वर महाजन असे तीन जण जळगावहून पैसे घेऊन कारने धरणगावकडे निघाले होते. धरणगाव बायपासजवळ त्यांच्या कारला समोरुन आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली. त्यातील दोन जण खाली उतरले. त्यापैकी एकाने लोखंडी रॉडने चालकाच्या बाजूची तर दुसऱ्याने डाव्या बाजूची काच फोडली.
एकाने चालक उमेश ठाकरे याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. ती मागील सीटवर बसलेल्या दीपकच्या डोळ्यावर उडाली. यानंतर दोघे गाडीच्या बाहेर पडले. ही संधी साधत कारच्या डिकीतून पैसे भरलेल्या पांढऱ्या रंगाच्या तीन बॅग घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी पलायन करतांना वेगळीच कार वापरली. याप्रकरणी योगीराज पाटील (३८) याच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात भादंवि कलम ३९४ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post