पुणे । राज्यातील वातावरणात बदल झाला असून राज्यातील काही भागातून थंडी गायब झाली आहे. यामुळे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यातच विदर्भात पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आलाय.
विदर्भात कुठे पावसाचा इशारा?
विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील २८ जिल्ह्यांमध्ये गारपीटीची अशी कोणतीही शक्यता नाही. मात्र, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
Discussion about this post