नवी दिल्ली । भारतात सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीआधी गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. अमित शहा यांनी शनिवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच सीएए कायदा आणला जाईल याबाबत कुठलीही शंका नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तसेच याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिली. याद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील स्थलांतरित अल्पसंख्याक समुदायातील लोकांना नागरिकत्व दिले जाईल. CAA अंतर्गत नागरिकत्व देण्यासाठी गृह मंत्रालयाकडून ऑनलाइन प्रणाली तयार केली जात आहे.
अमित शहा पहिल्यांदाच CAA लागू करण्याबाबत बोलले आहेत असं नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंगाल दौऱ्यावेळी त्यांनी CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असा दावा केला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर, अमित शहा सीएएबाबत लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.