जळगाव । जळगाव शहरात मद्यधुंद तरुणांनी प्रचंड हैदोस घातला असून दोन मद्यपी तरुणांच्या गटामध्ये झालेल्या राड्यानंतर त्यांनी 17 ते 18 नागरिकांना लाकडी दंडुक्याने मारहाण केली. या मारहाणीत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत मद्यपी तरुण तेथून पसार झाले होते. ही घटना बुधवार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकात घडली असून घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
याबाबत असे की, काव्यरत्नावली चौकात सायंकाळच्या सुमारास अबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने बसलेले असतात. बुधवारी सायंकाळच्या समारास तेथील हॉटेल नैवेद्यजवळ काही तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते. यावेळी दोन मद्यधुंद तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. तरीदेखील हा वाद मिटला नाही. दोन्ही तरुणांनी आपापल्याकडच्या तरुणांना बोलावून घेतलं.
दोन्ही गटाच्या टवाळखोरांनी या परिसरात नैवेद्या हॉटेलबाहेर प्रचंड तोडफोड केली. यावेळी त्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या तब्बल 17 ते 18 नागरिकांना मारहाण केली.संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी यावेळी घटनास्थळी जमलेली गर्दी पांगवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तरुणांचा मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Discussion about this post