आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात सभा आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये त्यांची पहिली सभा झाली.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर एसीबीने केलेल्या कारवाईवरून जोरदार निशाणा साधला. तसेच दिवस बदलतात, दुर्दैवाने आज त्यांचे दिवस, उद्या आमचेही येतील, तेव्हा सोडणार नाही, अशा शब्दात ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. तर भाजपालाही इशारा दिला.
‘ते तुमच्याकडे येत नाहीत, त्याच्यांवर तुम्ही दडपण आणतात. पण तुम्ही किती काही केले तरी हा मर्द मावळा झुकणार नाही’, अशा शब्दात ठाकरेंनी आमदार साळवींचं कौतुक केलं. तसेच मोडेल पण वाकणार नाही पण तुम्हाला मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राजन साळवी यांच्याबाबत कोणी तक्रार केली. त्यांच्या घरी काय सापडलं ? असा सवाल करत राजापूरमधील इच्छुक उमेदवार जे काही खर्च करत आहेत, त्यांच्या घरी पहिल्यांदा धाड टाका, असं आव्हान ठाकरेंनी एसीबीला दिलं. त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी करा, ते प्रत्येक गोष्टीतून पैसा काढत आहेत, त्यांची अगोदर चौकशी करा, अशा शब्दात ठाकरेंनी नाव न घेता सामंत बंधूंवरही निशाणा साधला.
Discussion about this post