अमरावती : महाराष्ट्राला हादरवून सोडणार अत्याचाराची एक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेत पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तरुणीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे (सर्व राहणार मालखेड) यांचा समावेश आहे. यात महेश वाघमारे हा पीडितेला प्रसाद घेण्यासाठी मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून घेऊन गेला. दरम्यान पीडितेला त्याने रात्रभर त्याच्या घरी ठेवले. यानंतर २८ जानेवारीला तिच्या गावी सोडून देण्यासाठी महेशने तिला दुचाकीवर बसवले.
मात्र, गावी न नेता पिंटू हरले याला सोबतीला घेत त्याने तरुणीला मालखेड शिवारातील शेतात नेत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान तिथं अन्य तिघे आले आणि त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केला. याला पीडितने विरोध केला असता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी देखील दिली. दरम्यान याप्रकरणी पिडितेने शेंदुरजनाघाट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पाचही आरोपींना अटक केली आहे.
Discussion about this post