मुंबई । शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागल्याचे चित्र सध्या दिसत असून आज खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे बंधु संदीप राऊत यांची ईडी चौकशी होणार आहे. या सर्व ईडी चौकशींवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
“महाराष्ट्रातून उद्योग पळून जात आहेत. ८००० कोटींचा अम्बुलन्स घोटाळा आहे. राहुल कूल यांचा ५०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे, त्यावर सरकारने बोलावं. अजित पवार यांच्या ७०,००० कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर बोलावं, सरकारमध्ये ती हिंमत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
तसेच “हा खिचडी घोटाळा जर झाला असेल तर त्यातले सगळे लाभार्थी हे ज्यांनी पालिकेकडून पैसे घेऊन खिचडी वाटप केले नाही, ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात आहेत. त्यामधल्या काहींचं वर्षा बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर केटरिंग चालू आहे, सूरज चव्हाणला अटक केली मात्र त्यांना हात लावत नाही,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “या घोटाळ्यात अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कर्नाल या लोकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार महापालिकेत केला आहे. यांची नावे घेण्याची ईडीची हिंमत आहे का? असा सवाल करत पलटवार करण्याची संधी आम्हालाही मिळणार आहे. आम्ही वार केल्यानंतर तुम्ही उठणारही नाही.. असा थेट इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.
Discussion about this post