नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे. त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे.
या निवडणूकीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024 ला निघेल. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील या सहा खासदारांचा समावेश?
त्यामध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला राज्यसभेचं सदस्य आणि खासदार म्हणून पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या या 6 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीला सर्वच पक्षांकडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post