चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात झालेल्या 2 अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उभ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने दुचाकीवर मांदुर्णे (ता.चाळीसगाव) येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला तर याच भागात अन्य एका अपघातात आणखी एकाचा मृत्यू झाला. चाळीसगाव -मालेगाव रस्त्यावर साकूर फाट्याच्या जवळ शुक्रवारी (ता.२५) पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाला. मांदुर्णे (ता.चाळीसगाव)येथील चौघे तरुण (एमएच ४१ एस.१३७२) दुचाकीने परिसरातील गावाच्या यात्रेला गेले होते.
रात्री तमाशा पाहिल्यानंतर हे चौघे घराकडे मांदुर्णे येथे दुचाकीने येत असताना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास साकूर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला जबर धडक झाली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील चौघेही फेकले गेले.
त्यात समाधान रावण पाटील (वय ३२) कैलास धनराज पाटील (वय ४०) गंभीर जखमी झाले. त्यांना मालेगावला उपचारासाठी नेताना दोघांचा मृत्यू झाला. रशीद मुसा पिंजारी (वय ४२) आणि बाला सुभाष बेलदार (वय ३२) जखमी आहेत. मृत दोघे घरातील कर्ते असल्याने त्यांच्या मृत्यूने मांदुर्णे गावावर शोककळा पसरली आहे.
पिलखोडजवळ तरुण ठार
याच चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरच पिलखोड गावाजवळ राजनंदिनी हॉटेल जवळ रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या आणखी एका अपघातात अक्षय सतीश तागडे (वय २३, मंगळणे (ता.नांदगाव) या तरुणाचा मृत्यू झाला.
अक्षय तागडे हा रस्त्याच्या कडेला उभा असताना मालेगावकडून चाळीसगावकडे जाणारी (एमएच १९ सीयू.०४६६) वरील चालक अजिंक्य खैरनार रा. चाळीसगाव याने त्याने त्याच्या ताब्यातील वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यात तागडे हा गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ओम राजेंद्र काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक अजिंक्य खैरनार याच्या विरोधात मेहूणबारे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रोहीदास माळी तपास करीत आहेत.
Discussion about this post