मुंबई । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या वेठीवर पोहोचले आहे. मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ तसेच वकिलांसोबतही चर्चा केली. या चर्चेनंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी नगर चौकात सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सरकारने काढलेला जीआर वाचून दाखवला.
“आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वांना आवाज गेला पाहिजे, गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर २ वाजता याबाबत जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह अंतरवाली सराटीमधून २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सरकारदरबारी हालचाली सुरू झाल्या होत्या. जरांगे पाटील यांच्याशी वारंवार सरकारकडून चर्चा करत मुंबईमध्ये उपोषण न करण्याची विनंती केली जात होती. अखेर आता जरांगे पाटील यांच्या या लढ्याला मोठे यश आल्याचे दिसत आहे. सरकारसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सभा घेत मराठा बांधवांना सरकारसोबत झालेल्या चर्चेबाबत स्पष्टिकरण दिले.
Discussion about this post