मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांनी येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये म्हटलं आहे
गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. संबंधित कारवाई झाली तेव्हा रोहित पवार हे विदेशात गेले होते. कारवाई झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मुंबईत परतले होते. त्यांनी या कारवाईवरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीका केली होती. पण आता त्यांना थेट ईडी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे.
बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत. पशू खाद्य हे बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट आहे. तसेच या कंपनीने पुढे साख उत्पादनही केलं. या कंपनीचे बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केले जातात.
Discussion about this post