पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून असह्य करणाऱ्या उकड्यामुळे नागरिक हैराण झाले असून यातच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
येत्या ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार.
राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, काल रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा आणि विजांच्या कडकडाटासह विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.
दरम्यान, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Discussion about this post