अमळनेर । अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे शेतकऱ्याने पीककर्ज फेडता न आल्याच्या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील जितेंद्र शांताराम शिसोदे (वय ४२) असे शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. जितेंद्र शिसोदे हा पत्नी, २ मुले, २ भाऊ परिवारासह डांगरी गावात वास्तव्यास होता. शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करीत होता. गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेल्या पीक कर्ज कसे फेडता येईल या विवंचनेत तो होता. त्यातूनच त्याने २६ डिसेंबरला राहत्या घरी दुपारी छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे नेण्यात आला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पाटील यांनी व मारवड पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुनील तेली करीत आहे.