मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष बाकी असलं तरी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विजयाची खात्री असणाऱ्या उमेदवारांची शोधाशोध या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळेच आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. सध्या संभाव्य यादीनुसार जामनेर मतदार संघातील आमदार तथा मंत्री गिरीश महाजन यांना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आहे यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही सध्या प्रत्येक पक्ष आपल्या परीने स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहीर करत आहे. लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन-22 हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे संजय राऊत यांनी आमचे संसदेत 19 खासदार किंवा त्याहून अधिक खासदार दिसणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीत 19 जागा कशा काय मागू शकतात? असा सवाल केला आहे. मात्र, दुसरीकडे हाच शिंदे गट भाजपकडे लोकसभेच्या 22 जागांवर दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. संभाव्य उमेदवार
भाजप : रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन
शिवसेना UBT : सुनील प्रभू, विशाखा राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस : अदिती तटकरे
शिवसेना ( शिंदे गट) : दीपक केसरकर
शिंदे गटाचा 22 जागांवर दावा
Discussion about this post