जळगाव । राज्यातील अनेक रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेना गेले आहे. यात खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात एसटी बस थेट सुत गिरणीत जाऊन पाण्याच्या कुंड्याला धडकली. या अपघातात सुदैवाने प्रवाशांसह वाहक, चालक थोडक्यात बचावले.
चोपडा आगाराची बस चोपड्याहून नाशिकला निघाली होती. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्डयाचा चालकाला अंदाज न आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले, यातच बाजूला असलेल्या खडीच्या ढिगार्यामुळे ते वाहन थांबवू शकले नाही. परिणामी भरधाव वेगात असलेली बस ही सरळ चोपडा सूतगिरणीच्या गेटमधून आत शिरली.
अवघ्या काही सेकंदांचा हा थरार सूतगिरणीच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या बसमध्ये जवळपास 60 ते 65 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. तर सुदैवाने सगळे सुखरूप असून बचावले आहेत. एकही प्रवासी जखमी झाला नसल्याने सुदैवाने मोठी हानी होता होता टळली आहे. मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यावरील मोठे खड्डे बुजावा अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.
Discussion about this post