नांदेड । आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने जिल्ह्याजिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची प्रतिक्रीया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. काल गुरुवारी बावनकुळे नांदेड दौऱ्यावर होते. मुखेड आणि नांदेड शहरात त्यांनी 100 सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Discussion about this post