नवी दिल्ली । राजधानी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी करत लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई करत आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी एक अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. सहा जणांनी या घटनेचा कट रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.
दरम्यान, दुसरीकडे TMC खासदार डेरेक ओब्रायन संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. सोबतच काँग्रेसचे सुद्धा पाच खासदार निलंबित करण्यात आले.
काँग्रेसचे पाच लोकसभा खासदार, टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांनाही लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.