मुंबई : आरबीआयची चलनविषयक धोरण समितीची तीन दिवशीय बैठक आज शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी संपली. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. सोबतच आरबीआयने काही ठिकाणी UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवली आहे.
आरबीआयच्या या निर्णयानंतर आता यूपीआयच्या मदतीने हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जास्त पेमेंट करता येणार आहे. या ठिकाणी प्रत्येक व्यवहारासाठी 1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंत यूपीआयद्वारे पेमेंट करता येईल. या निर्णयामुळे या संस्थांमध्ये यूपीआयच्या वापराला चालना मिळणार आहे. तसेच रुग्णालयाची बिले आणि शाळा-कॉलेजची फी भरताना होणारी गैरसोय कमी होईल.
ऑटो पेमेंटची मर्यादा वाढवली
आरबीआयने विशिष्ट व्यवहारांसाठी यूपीआय ऑटो पेमेंटची मर्यादा वाढवली जात असल्याचीही घोषणा केली आहे. यानुसार, यूपीआय ऑटो पेमेंट केल्यावर अतिरिक्त घटक प्रमाणीकरण (AFA) आवश्यक आहे. सध्या 15,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी ऑटो पेमेंट केल्यावर AFA लागू होते. आता ही मर्यादा म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, इन्शुरन्स प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि क्रेडिट कार्ड रिपेमेंटसाठी 1 लाख रुपये करण्यात येत आहे.
Discussion about this post