नवी दिल्ली । देशातील चार राज्य म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणूकांच्या निकालाचे कल हाती आले असून यात तीन राज्यात भाजपने आघाडी मिळवली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. राजस्थानात सत्ता राखण्यास काँग्रेसला अपयश आल्याचं दिसून येतंय तेलंगणात मात्र काँग्रेसला विजयाची चव चाखता येणार आहे. कारण, बीआरएसला पिछाडीवर सोडत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, 3 राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष पराभवाच्या छायेत का आहे? याची अनेक कारणं राजकीय अभ्यासकांनी सांगितली आहे.
काँग्रेसची कमकुवत पक्षबांधणी
ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष खूपच पिछाडीवर पडताना दिसून आला. एक काळ असा होता, की काँग्रेसच्या विविध संघटना पक्षासाठी खूप काम करत असत. त्यामुळे पक्षाची धोरणे आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे सोपे जात होते. मात्र काही काळापासून या सर्व संघटना सुस्त असल्याचं दिसून आलं. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला.
काँग्रेसच्या पराभवाची ५ मोठी कारणं
काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेतृत्वावरील विश्वासाचा अभाव. विधानभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत दिसले.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी दिसून आली. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटातील संघर्षाचा काँग्रेसला मोठा फटका बसला.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक छोटे नेतेही भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हा काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. याचा फटका निवडणुकीत बसला.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रचार करत मतदारांना अनेक आश्वासने दिली. पण मतदारांना त्यांच्या आश्वासनांवर विश्वास बसला नाही.
काँग्रेस नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केलं. याचाही फटका काँग्रेसला बसल्याचं बोललं जातंय.
Discussion about this post