चोपडा । तुरीच्या शेतामध्ये गांजाची शेती करणाऱ्या शेतीचे कारस्थान पोलिसांनी उधळून लावले आहे. पोलिसांनी छापा मारून तब्बल ८ क्विंटल वजनाचा दोन ट्रॅक्टर ओला गांजा जप्त केला. हा प्रकार चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगामधील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा याच्या शेतात समोर आला आहे. यात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जमा केलेल्या जवळपास ८ क्विंटल ओल्या गांजाची किंमत सुमारे ३८ लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उत्तमनगर येथे रवी किलाऱ्या पावरा या शेतकऱ्याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली होती. त्याआधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकली.
यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओला हिरवा गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेले दोन ट्रॅक्टर गांजा जप्त करीत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर नायब तहसीलदार सचिन बांबोडे यांनी पंचनामा केला. सरकारी पंच म्हणून कनिष्ठ अभियंता बालाजी दहीफळे यावेळी उपस्थित होते.
कारवाईत रवी किलाऱ्या पावरा फरार झाला असून त्याचा अल्पवयीन भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कारवाई पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहा फौजदार देविदास ईशी, हवालदार राकेश पाटील, किरण पाटील, पोलिस शिपाई रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींनी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
Discussion about this post