जळगाव | येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या ३४ व्या नाशिक परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे पुरूष व महिला अशा दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद जळगाव पोलीस विभागाने पटकाविले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला. “नेहमी बंदोबस्त व नागरिकांच्या संरक्षणात व्यस्त असलेला पोलीस मैदानावर ही मजबूत दिसला यांचा अभिमान वाटतो.” असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले.
समारोप समारंभात आमदार किशोर पाटील, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपद न मिळावेल्या संघांनी खचून न जाता पुढील वेळेस विजेतेपद पटकाविण्याची जिद्द ठेवावी. या स्पर्धांमध्ये पुरूषांबरोबर महिला खेळाडूंनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जळगावचे मल्ल विजय चौधरी यांनी देशपातळीवर पोलीस विभागांचा नावलौकिक केला आहे. असे असंख्य विजय चौधरी आपल्याला मधून तयार झाले पाहिजेत. आगामी काळात नाशिक परीक्षेत्राचे पोलीस संघ देशपातळीवर नावलौकिक करेल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बीजी शेखर पाटील म्हणाले, पोलीस दलाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या संकटांना तोंड देण्यासाठी पोलीसांचे मानसिक संतुलन चांगले असणे गरजेचे आहे. चांगले मानसिक संतुलन ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. आगामी काळात परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण करण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
जळगाव संघास २० वर्षांनी विजेतेपद
३४ व्या नाशिक परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर अशा ६ संघांनी सहभाग घेतला होता. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धा पाच दिवस घेण्यात आल्या. यात ६८० पुरूष व ११५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धांचे २०१५ नंतर पहिल्यांदाच यजमानपद जळगाव पोलीस संघाने भूषविले. जळगाव पुरूष व महिला संघाने २० वर्षांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते चषक स्वीकारला.
सांघिक खेळात विजेते
पुरूषांच्या विविध सांघिक खेळात विजेते – खेळ व कंसात विजेते संघ
फुटबॉल, हॉकी, कुस्ती, जलतरण, बॉक्सिंग (जळगाव), खो खो (अहमदनगर), कबड्डी, बास्केटबॉल, क्रॉस कंट्री, हँडबॉल, (नाशिक शहर), हॉलीबॉल, ज्यूदो (धुळे) या संघांनी विजेतेपद पटकावले.
महिलांच्या विविध सांघिक खेळात विजेते – खेळ व कंसात विजेते संघ
कबड्डी, बॉक्सिंग, कॉस कंट्री, बास्केटबॉल (जळगाव), खो खो (अहमदनगर), हॉलीबॉल, कुस्ती, ज्यूदो, वेटलिफ्टिंग (नाशिक शहर) या संघांनी विजेतेपद पटकाविले.
यावेळी वैयक्तीक प्रकारातील खेळातील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणापूर्वी सहभागी संघांनी मार्च पंथ संचलन केले. यावेळी उपस्थित मान्यवर व पोलीस अधिकारी यांच्यात रस्सीखेच स्पर्धा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महसूल व पोलीस अधिकारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पोलीस संघाने पटकावले.
याप्रसंगी नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अहमदनगर अपर पोलीस स्वाती भोर, रमेश चोपडे उपस्थित होते.
अहवाल वाचन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले. आभार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मानले.
Discussion about this post